Satara Fire: घरगुती भांडणातून पतीने पेटवलं घर, आगीचा भडका उडाल्याने आजूबाजूची 10 घरं खाक
या भांडणानंतर रागाच्या भरात घर पेटवलं. सिलेंडरचा स्फोट होऊन आजूबाजूची 10 घरं देखील पेटली.
सातारा (Satara) मध्ये पती-पत्नीच्या घरगुती भांडणामधून पतीने स्वतःच्या घराला आग लावल्यामुळे आजुबाजूच्या 10 घरांनी पेट घेऊन खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीने आग लावल्यानंतर घरातील सिलेंडर पेटला. यामुळे आगीचा भडका उडाला आणि आजूबाजूची 10 घरं देखील पेटली आहेत. यामध्ये अंदाजे 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
सातारा मध्ये ही घटना पाटण (Patan) तालुक्यातील माजलगाव येथील आहे. संजय पाटील या व्यक्तीचं त्यांच्या पत्नीसोबत भांडण झालं होतं. या भांडणानंतर रागाच्या भरात घर पेटवलं. या घटनेनंतर गावातील लोकांनी संजय पाटील यांना चोप दिला. दरम्यान संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी मध्ये कोणत्या गोष्टींवरून वाद झाला हे माहित नाही पण त्यामुळे इतर 10 घरांची देखील राख रांगोळी झाल्याचं पहायला मिळालं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी पती संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर सुदैवाने या आगीमध्ये पेटलेल्या 10 घरांमधील कोणताही सदस्य मृत्यूमुखी पडलेला नाही. पण आजूबाजूची 10 घरं खाक झाल्याने 50 लाखांची वित्त हानी झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील भिवंडीत अचानक फर्निचर गोदामाला आग लागल्याची घटना ताजी आहे. त्यामध्ये 40 दुकानांनी पेट घेतला होता. यामध्येही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर काही दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम परिसरातील शनी नगर येथे देखील अशीचा घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. सुनेवर हल्ला केल्यानंतर सासऱ्याने घर पेटवून दिले होते. यामध्ये सासरे किसान जाधव यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.