IPL Auction 2025 Live

Satara Accident: साताऱ्यात खासगी बसचा अपघात, ट्रॅव्हल्सची कंटेनरला पहाटे धडक

अपघाताची माहिती समजताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्य तात्काळ घटनास्थळी हजर झाले.

Accident (PC - File Photo)

पुणे- बंगळुरु महामार्गावर खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या धडकेमुळं भीषण अपघात झाला. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून, ड्रायव्हरसह चारजण जखमी झाले आहेत. सुरज भीमराव शेवाळे (वय 27 कराड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या कंटेनरला (एनएल 01 जी 4069) शिरवळजवळील ट्यूब कंपनीजवळ ट्रॅव्हल्सने (एमएच 01 डीआर 0108) पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात आज शनिवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात ट्रॅव्हलच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा - Buldhana Bus Accident: टायर फुटल्यानंतर बसमधील ज्वलनशील वस्तूंमुळे लागली आग; अपघातग्रस्त बस मालकाची प्रतिक्रिया)

या अपघातात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला असून, सुरज भीमराव शेवाळे असे त्याचे नाव आहे. तर राजश्री अनिल मोरे (वय 29) (वय 45). अमित महादेव पवार (वय 29), अंकुश पाटील (वय 48) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण ट्रॅव्हल्समधून पुण्याहून आपल्या गावाकडे निघाले होती.

अपघाताची माहिती समजताच शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तुषार कुंभार, सुजित मेंगावडे व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्य तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने जखमींना शिरवळ येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  शिरवळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. अपघातग्रस्त ठिकाणी शिरवळ परिसरातील नागरिक मदतीसाठी आले होते.