Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आतापर्यंत काय घडले? देवेंद्र फडणवीस सभागृहात काय म्हणाले?
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि संबंधितांवरही दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. काय काय घडलं या प्रकरणात? घ्या जाणून
Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Case: बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे. या भयावह हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या प्रकरणावर निवेदन सादर करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत घडलेला आणि ज्ञात झालेला बहुतांश तपशील सभागृहाला अवगत केला आणि विरोधकांसह स्वपक्षीय आमदारांनीही उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समाधन करण्याचा प्रयत्न केला. अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारे हे प्रकरण आहे तरी काय? आणि त्यात आतापर्यंत नेमके घडले तरी काय?
वाल्मिक कराड आणि मंडळी जोरदार चर्चेत
बीड जिल्ह्याचे राजकारण, सत्ताकारण आणि गुन्हेगारी विश्व यांमध्ये एकाच वेळी चर्चेत असलेले नाव म्हणजे वाल्मिक कराड. विविध राजकीय पक्ष, राजकीय नेते आणि काही प्रमाणात सरकारी अधिकाऱ्यांमध्ये बसऊठ असलेल्या कराड यांचे नाव या प्रकरणात जोरदार गाजले. खरे तर हेच कराड अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. त्यातच त्यांच्या नावावर विविध गुन्हे दाखल असून आरोपही झालेले आहेत. संतोष देशमुख प्रकरणातही त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे नाव आले आहे. (हेही वाचा, Poonam Mahajan: प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबीक कारण नाही; कन्या पूनम यांचे खळबळजनक वक्तव्य)
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोक्का लावण्याचे आश्वासन
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विधीमंडळात सभागृहासमोर निवेदन करताना देवेंद्रे फडणवीस म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करुन थांबणार नाही. तर दोषींवर मोक्का कायद्यान्वयेही कारवाई केली जाईल. मग या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड असो किंवा त्यांच्याशी संबंधीत इतरही कोणी. खरेतर कराड यांचे सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. सर्वांशीच त्यांचे फोटो आहेत. त्यात आमच्यातील आणि तुमच्यातील (सत्ताधारी आणि विरोधक) अशा सर्वांचा समावेश आहे. असे असले तरी कोणताही दोषी कीतीही मोठा असला तरी, त्याची गय केली जाणार नाही. पुरावे सापडल्यानंतर आणि चौकशीत दोषारोप स्पष्ट होणाऱ्या सर्वांवर कायदेशीर प्रक्रियेतूनच कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
बीडच्या पोलीस अधिकक्षकांची बदली
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात केवळ गुन्हाच दाखल झाला नाही. तर, या प्रकरणात बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचीही बदली करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर खालच्या श्रेणीतील दोषी आधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मात्र, जर कोणी दोषी नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर मात्र उगाचच कारवाईचा बडगा उगारला जाणार नाही. कारण पोलिसांचेही मनोबल टीकावणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी
या प्रकरणात नावे पुढे आलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पण, केवळ गुन्हे दाखल करुन नव्हे तर या प्रकरणाची दोन प्रकारे चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांतर्गत एसआयटी स्थापन करुन केली जाईल. तसेच, हे प्रकरण नेमके काय आहे, यासाठी एक न्यायालयीने समिती स्थापन करुनही चौकशी केली जाईल, असे मख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवाय या समित्यांचा अहवाल तीन ते सहा महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करुन येईल,असेही ते म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या बंधूंची प्रतिक्रिया
मयत संतोष यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या निवेदनानंतर मी समाधानी आहे. उद्या आमच्या बंधूंचा तेरावा आहे. आता आमचा भाऊ तर परत येणार नाही. पण, उद्या संध्याकाळपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस अधिक्षकांची बदली करणे हा केवळ मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्याबाबत आम्हाला काहीच म्हणायचे नाही. पण, मला आणि माझ्या कुटुंबाला आणि गावाला न्याय हवा आहे, असे देशमुख म्हणाले.