Sanjay Raut यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल होणार; Kirit Somaiya यांची पत्नी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
मेधा किरीट सोमय्या 18 मे रोजी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा आणि छळाचा गुन्हा दाखल करणार आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढू शकतात. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहेत. खुद्द भाजप नेत्यानेच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात पोलिसांत यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोमय्या यांनी सांगितले की, त्यांची पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा किरीट सोमय्या 18 मे रोजी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा आणि छळाचा गुन्हा दाखल करणार आहेत. आयपीसीच्या कलम 499, 500 नुसार मुंबईच्या सेवरी कोर्टात हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई होणार असल्याचे त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले आहे. (हेही वाचा - Shivsena On BJP: शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांच्या विरोधात बोला आणि केंद्रीय सुरक्षेचे विशेष पथक मिळवा, असे पॅकेज जारी करण्यात आले आहे, शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका)
गेल्या आठवड्यात, भाजप नेत्याच्या पत्नीने राऊत यांच्याविरुद्ध मुलुंड पूर्व येथील नवघर पोलीस ठाण्यात मीडियामध्ये "दुर्भावनापूर्ण आणि अयोग्य विधाने" केल्याबद्दल तक्रार दाखल केली. तत्पूर्वी, त्यांनी शिवसेना नेत्याला मानहानीची नोटीस देखील पाठवली होती आणि त्यांच्या "खोट्या आणि बदनामीकारक" विधानांसाठी बिनशर्त माफी मागावी असे सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राऊत यांनी दावा केला होता की, डॉ. मेधा किरीट सोमय्या आणि सोमय्या कुटुंबीयांनी व्यवस्थापित केलेली एनजीओ युवा प्रतिष्ठान 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सामील होती.