'हम होंगे कामयाब..जरूर होंगे' म्हणत संजय राऊत यांचे लीलावती रुग्णालयातून ट्विट
विशेष म्हणजे लीलावती रुग्णालयातउपचार घेत असतानाही राऊत यांनी ट्विट केल्याने याबाबत खास चर्चा होत आहे.
मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असणाऱ्या उलथापालथेत शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव प्रकर्षाने समोर येत आहे. शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची दावेदारी ठामपणे मांडणाऱ्या राऊतांचे खास ट्विट्स हा चर्चेचा विषय ठरत आहे. काल, 11 नोव्हेंबर रोजी रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक मुळे राऊत यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले होते, यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती स्थिरावत आहे, अशातच हॉस्पिटल मधून सुद्धा आज संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan) यांच्या "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती । या ओळी ट्विटमध्ये लिहीत सोबतच' हम होंगे कामयाब.. जरूर होंगे... असे राऊत यांचे ट्विट आहे.
सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांची भूमिका विशेष ठरली होती. भाजपाशी राजकीय संघर्ष असो वा अन्य पक्षांशी सुरु असणाऱ्या वाटाघाटी राऊत यांनी शिवसेनेचा गाडा हाकत पुढाकार घेतला होता. या दिवसात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ट्विट्सच्या रूपात त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले होते. तर आजचे राऊत यांचे ट्विट हे शिवसेनेचे आमदार व कार्यकर्ते यांचे धैर्य वाढवण्याच्या दृष्टीने असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत ट्विट
दरम्यान, भाजपाकडून सत्ता स्थापनेत असमर्थता दर्शवल्यावर काल शिवसेनेला बहुमत मिळवणारा दुसरा मोठा पक्ष म्ह्णून राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यानुसार आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी अन्य शिवसेना नेत्यांच्या सोबत जाऊन आपला दावा राज्यपालांकडे सोपवला होता, मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पाठिंबा न मिळाल्याने सेनेला बहुमत सिद्ध करणे शक्य झाले नाही. तर आज कोश्यारी यांच्याकडून राष्ट्रवादीला संध्याकाळी 8.30 पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी मुदत दिली आहे, यावेळी शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे