Param Bir Singh's Letter प्रकरणावर संजय राऊत यांचा सरकारला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, या सर्व प्रकारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व प्रकारावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनेनंतर सरकारमधील प्रत्येकानं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. (संजय राऊत यांच्या ट्विटवर भाजप नेता राम कदम यांचा शायराना अंदाजात पलटवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्या नार्को टेस्टची केली मागणी)
संजय राऊत म्हणाले की, "अशा प्रकारचे आरोप होणं दुर्दैवी असून ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. सरकारमधल्या प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोडे उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का? हे तपासलं पाहिजे."
पुढे ते म्हणाले की, "परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य ती भूमिका घेतील." तसंच त्या पत्राची सत्यताही तपासून पाहिली जाईल, असेही ते म्हणाले. पोलीस खातं हा राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचं प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,' असा सल्लाही राऊत यांनी दिला.
"मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही गोष्टी घडल्या. यावर वेळीच नियंत्रण ठेवण्याची गरज होती. यावर मी सामनामधूनही अनेकदा लिहिलं आहे. पण सत्तेपुढे शहाणपण नसतं. सत्तेत आल्यावर प्रत्येकाला शहाणं झालो असं वाटतं पण ते तसं नसतं. हे या प्रकरणावरुन आता कळलं असेल," असंही ते म्हणाले.