Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case: 'न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालयं'; अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोषी ठरल्यानंतरही संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम; 'भाजपा' वर हल्लाबोल
सध्या संजय राऊत यांना या प्रकरणात 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.
आज माझगाव न्यायालयाने (Metropolitan Magistrate Mazgaon) संजय राऊत (Sanjay Raut) यांना डॉ. मेधा किरीट सोमय्या (Dr Medha Kirit Somaiya) यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात (Defamation Case) दोषी ठरवलं आहे. कोर्टाने राऊतांना 15 दिवस कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावत शिक्षा सुनावली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. '15 दिवस काय 15 वर्ष देखील कैद दिली तरी सत्य बोलणं थांबवणार नसल्याचं' संजय राऊत म्हणाले आहेत. या प्रकरणी आता संजय राऊत सेशन कोर्टात दाद मागणार असल्याचे म्हणाले आहेत.
संजय राऊतांना कोणत्या प्रकरणामध्ये शिक्षा?
मीरा भाईंदर मध्ये काही शौचालयं बांधण्याचं कंत्राट डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रं सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केला होता त्याप्रकरणी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती.
संजय राऊत यांची भूमिका काय?
संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मीरा भाईंदर मधील शौचालय घोटाळ्याचा पहिला उल्लेख मीरा भाईंदर मनपाचे विरोधी पक्ष नेते प्रविण पाटील यांनी केला होता त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यानंतर महापालिकेचा एक अहवाल आला आहे. त्यामध्ये गडबड असल्याचं म्हटलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतही याचा उल्लेख केला आहे. मग ही माहिती केवळ मी संजय राऊत ने दिल्यानंतर 'अब्रुनुकसानी' कुठून आली? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
'महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतला तुरूंगात टाकण्याच्या मनसुब्याने हा निकाल देण्यात आल्याची' प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. 'कोर्टाचा आम्ही आदर करतो पण आपले पुरावे ग्राह्य धरले नसल्याने आपाण वरील कोर्टात दाद मागणार असल्याचं' ही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आता संजय राऊत यांना कोर्टाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देत यावे यासाठी त्यांच्या शिक्षेला 30 दिवसांसाठी स्थगित देत 15 हजारांच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर केला आहे.