संजय राऊत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 'रोखठोक' मधून निशाणा; 'पोलिस खात्याचं नेतृत्त्व 'सेल्यूट' साठी नव्हे कणखर नेतृत्त्व देण्यासाठी' म्हणत सल्ला
'सौ सोनार की एक लोहार की' असं गृहमंत्र्याचं वागणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सरकार विरूद्ध काही IAS, IPS पोलिस खात्यातील अधिकारी अशा संघर्षातून काही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये विरोधक सत्ताधार्यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडत नाही त्यामध्येच आता सामना च्या 'रोखठोक' सदरात शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सचिन वाझे, रश्मी शुक्ला, परमबीर सिंह या अधिकार्यांमुळे राज्यात महाविकास आघाडी अडचणीमध्ये आल्याची बघायला मिळाली. त्यावरच आजच्या रोखठोक मध्ये भाष्य करताना संजय राऊतांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावलं आहे. 'सौ सोनार की एक लोहार की' असं गृहमंत्र्याचं वागणं अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पोलिस खात्याचं नेतृत्त्व केवळ 'सॅल्यूट' घेण्यासाठी नव्हे तर ते कणखर नेतृत्त्व देण्यासाठी असतं. अपघाताने गृहमंत्री झालेल्या अनिल देशमुखांनी काही वरिष्ठ अधिकार्यांशी विनाकारण पंगा घेतला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या वसुलींच्या आरोपांवर कोणताही प्रमुख मंत्री आपली प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आलेला नाही. त्यामुळे सुरूवातीला जनतेलाही त्यांचे आरोप खरे असल्याचं वाटलं. आज संजय राऊत यांनी मुंबईत स्फोटकांनी सापडलेली कार, सचिन वाझे अटक आणि मनसुख हिरेन प्रकरणावर परखड भाष्य केले आहे. Param Bir Singh's Letter प्रकरणावर संजय राऊत यांचा सरकारला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला.
सरकार सोबतच संजय राऊतांनी आज विरोधकांवरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला महाविकास आघाडी सरकार पाडण्याची घाई आहे. फाटक्या फुग्यात हवा भरण्याचं काम सुरू आहे. सुरूवातीला त्यांचे आरोप जोरदार वाटतात पण नंतर ते खोटेच ठरतात. अशा आरोपांमुळे सरकारं पडायला लागली तर केंद्रातील मोदी सरकार आधी पडेल. राज्यपालही ठाकरे सरकार पाडण्यासाठी राजभवनातील देव पाण्यात बुडवून बसले आहेत. भाजप नेते वारंवार तेथे भेटी घेऊन सरकार बरखास्तीची मागणी करतात त्यामुळे राजभवनाची देखील प्रतिष्ठा काळवंडली आहे. यावेळी त्यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीची देखील राज्यपालांना पुन्हा आठवण करून दिली आहे.