Sanjay Raut on PM Modi: तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे; संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
Sanjay Raut on PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णपणे हिटलरला फॉलो करतात. मोदी हिटलरसारखे इव्हेंट्स फार करतात. त्यामुळे मोदींच्या प्रचारात आणि हिटलरच्या प्रचारात बरंच साम्य आहे. हिटलरच्या काळातही आजच्यासारखी विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली होती. तुम्ही नैतिकता पाळणार नसाल तर मला कोथळा काढण्याचा अधिकार आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.
शिवेसेनेने आयोजित केलेल्या सोशल मीडिया मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है. बाळासाहेब यांनी गरम रक्ताची पिढी राजकारणात आणली. बाळासाहेब तरुणांचे नेते होते. शिवसेना हा तरुणांचा पक्ष आहे. ताकद सेनेची आहे आणि सेनेचीचं राहील. देशातील सर्वांत मोठा ब्रँड शिवसेना आहे. जे खरं असते ते लोकप्रिय होतंच असं नाही, तर जे लोकप्रिय असतं ते खरं असतंच असं नाही. सध्याचं राजकीय वातावरण असंच काहीसं आहे”, असंही राऊत म्हणाले. (हेही वाचा - Sanjay Raut on Raj Thackeray: खोट्या भावनेने जाणाऱ्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला)
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये भाजपाकडून विषारी प्रचार करण्यात आला. मी जर रोज सकाळी बोललो नाही तर भाजपाचा कार्यक्रम सेट होणार नाही. अंगावर येणाऱ्यांना डम्पिंग फेकून दिलं जाईल. राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यामागे भाजपाचा हात आहे. सुशांत सिंह राजपूत, कंगणा राणावर यांच्या प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्या जेलमध्ये जाणार आहेत. आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हा आपला पहिला पराभव असतो. त्यामुळे शिवसेनेसोबत लढण तितकं सोपं नाही. आम्हाला जे करायचं होते ते आम्ही केले, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या आगामी उत्तर प्रदेशातील अयोध्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले. प्रभू राम त्यांच्याकडे खोट्या भावना घेऊन आणि राजकीय कारणांसाठी येणाऱ्यांना आशीर्वाद देत नाहीत, अशी घणाघाती टीका राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.