Sangli Triple Murder: तिहेरी हत्याकांडाने सांगली हादरली; जमिनीच्या वादातून मुलाने केली आई-वडील व बहिणीचा खून
उमदी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जिल्ह्याच्या पूर्व टोकास वसलेले एक गाव आहे.
सांगली (Sangli) जिल्हा आज तिहेरी हत्याकांडाने हादरला. जिल्ह्यातील जत (Jath) तालुक्यातील उमदी (Umadi) गावात संपत्तीच्या वादातून मुलानेच आई-वडील व बहिणीचा खून केला आहे. सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी, वय 58 असे या आरोपीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून सिद्धपाने हे तीनही खून केले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. उमदी हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जिल्ह्याच्या पूर्व टोकास वसलेले एक गाव आहे. मल्लिकार्जुन देवस्थानामुळे या गावात नेहमीच लोकांची वर्दळ असते.
मिळालेल्या माहितीनुसार, धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 मार्च रोजी पहाटे वडील गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (वय-82), आई नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (वय-75) आणि बहीण समुद्राबाई बिरादार (वय-62), अशा तिघांचे मृतदेह राहत्या घरात आढळले होते. धारधार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून हे खून झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला गेला आहे. संशयाची सुई सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी याच्यावर आहे. (हेही वाचा: कामोठे मध्ये दुहेरी हत्याकांड; कौटुंबिक वादात दिराने केली वहिनी आणि पुतण्याची निर्घृण हत्या)
उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट दिली. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान याधीही सांगली जिल्ह्यातील हिरवे गावात आई, मुलगी आणि सून अशा एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या करण्यात आली होती. बहिणीच्या आत्महत्येचा सूड घेण्याच्या भावनेने आरोपीने मित्राच्या मदतीने हे कृत्य केले होते. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.