विधानसभा निवडणूक 2024: Sana Malik-Sheikh अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून मैदानात; अजित पवार यांच्या NCP कडून उमेदवारी
अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ (Anushakti Assembly Constituency) येथून त्या निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख (Sana Malik-Sheikh) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ (Anushakti Assembly Constituency) येथून त्या निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. पक्षामध्ये त्यांच्याकडे सध्या पक्षाच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्तेपद आहे. उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता त्या आपला अर्ज दाखल करणारअसल्याचे समजते. अणुशक्तीनगर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी
नवाब मलिक यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यांना आजच एबी फॉर्म दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी आतापर्यंत अणुशक्तीनगर याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान या वेळी ते वेगळ्या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या ऐवजी अणुशक्तीनंगरमधून त्यांच्या कन्या सना मलिक निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यामुळे वडिलांच्या जागेवर उमेदवारी करत राष्ट्रवादी काँग्रेसचा गड त्या कायम राखतात का, याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा,Sana Malik On Devendra Fadnavis: नवाब मलिकांची मुलगी सना मलिकची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाल्या तुम्ही दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकासोबत दिसला होतात )
उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. भारतीय जनता पक्ष वगळता अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केला नाही. भाजपने आपली पहिली 90 जणांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्या कोणकोणते उमेदवार अर्ज दाखल करणार याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांना मिळणारा वेळही फारच कमी असेल. दरम्यान, लगेचच 23 तारखेला मतमोजणीही पार पडणार आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापण होण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. (हेही वाचा, Sandeep Naik Resigns as BJP: संदीप नाईक यांचा राजीनामा; भाजप सोडून हाती घेणार शरद पवार यांची तुतारी)
दरम्यान, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. दुसऱ्या बाजूला, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी,तसेच, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्चु कडून यांची प्रहार जनशक्ती संघटना यांसारखे काही छेटे घटक पक्षही रिंगणात आहेत. शिवाय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, संभाजिराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष आणि तत्सम अनेक छोटे-मोठे गट, अपक्ष उमेदवार या निवडणुकीत जनमताचा कौल आजमवू पाहात आहेत.