महात्मा गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे Sambhaji Bhide अडचणीत, अमरावतीत गुन्हा दाखल
राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे हे षड्यंत्र असल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत म्हणाले आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणार्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्यावर अमरावती (Amravati) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विधिमंडळातही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून कारवाईची मागणी करण्यात आली होती. राज्यातही अनेक ठिकाणी त्यावरून आंदोलनाच्या माध्यमातून कारवाईची मागणी केली जात होती. राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कलम 153 अंतर्गत भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी भिडे यापूर्वी देखील बेताल वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. नुकतेच मागील गुरूवारी बडनेरा मार्गावरील जय भारत मंगल कार्यालयात भिडेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. गांधी यांचे वडील मुसलमान होते, असा अजब दावा त्यांनी केला. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. भिडे यांच्या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. नक्की वाचा: Sambhaji Bhide on Live in Relationship: 'लिव्ह इन रिलेशनशिप' मुद्द्यावरुन संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य, वाईनच्या निर्णयावरुन राज्य सरकारवरही टीका .
भिडे यांना वादग्रस्त विधान करण्यासाठी भाजपने पुढे केले आहे. राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे हे षड्यंत्र असल्याचे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत म्हणाले आहेत. तर यशोमती ठाकूर यांनी देखील त्यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल विचारला आहे.
दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना 'संभाजी भिडे हे केवळ सोंगाड्या आहेत ते लिहून दिलेली स्क्रिप्ट सादर करत असल्याचे' म्हटले आहे.