Video: वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते; संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्र महिला आयोग दखल घेणार का?
अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे.
Sambhaji Bhide Controversial Statement: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. ‘वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते’ असे धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) आणि राष्ट्रीयत्व या विषयावर सांगली येथे बोलताना भिडे यांची जीभ कमालीची घसरली. भिडे यांच्या वक्तव्यानंतर महिला वर्ग, समाज आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही भिडे यांच्या विधानावर प्रचंड टीका होत आहे. दरम्यान, महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान (Sambhaji Bhide on Childless Woman) करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची महाराष्ट्र महिला आयोग दखल घेणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. संभाजी भिडे यांनी या आधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.
काय म्हणाले संभाजी भिडे?
सांगली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना संभाजि भिडे म्हणाले की, “जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं तसचं वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंच झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रित्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे. राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर आम्ही कमी पडतो. सुधारित नागरिकत्व कायदा भारतीयांना जोडणारा आहे. असं असतानाही काहीजण याबद्दल संभ्रम पसरवताना दिसत आहेत”, असेही भिडे म्हणाले. (हेही वाचा, Citizenship Amendment Act: राहुल गांधी फालतू, नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही; संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य)
संभाजी भिडे संपूर्ण पत्रकार परिषद व्हिडिओ
दरम्यान, वादग्रस्त विधाने करण्याची भिडे यांची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही भिडे यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. नाशिकमधील एका सभेत बोलताना भिडे यांनी म्हटले आहे, माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत 180 जोडप्यांनी आंबा खाल्ला असून, त्यापैकी 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे'', असा दावाही भिडे यांनी केला होता. त्या वेळीही भिडे यांच्या विधानावर प्रचंड टीका झाली होती.