Russia Ukraine Crisis: 'युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना मदत करा'; मंत्री जयंत पाटील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रशियासोबतच्या तणावावरून, त्या देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन माहिती आणि मदत देण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे
सध्या युक्रेन (Ukraine) देशाला शेजारील रशियापासून (Russia) युद्धाचा धोका आहे, अशात महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना युक्रेनमधील भारतीयांना, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर 100,000 हून अधिक सैन्य तैनात केले आहेत. युक्रेनच्या सीमेजवळील हवाई तळांवर रशियन लढाऊ विमाने मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच काळ्या समुद्रात रशियन युद्धनौकाही मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये जयंत पाटील म्हणतात, रशिया-युक्रेन सीमेवरील परिस्थिती गेल्या 15 दिवसांपासून चिघळत आहे. युक्रेनमध्ये सुमारे 18 हजार भारतीय आहेत, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत, जे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे लवकरात लवकर देशातून बाहेर काढावे. ते आमचे भविष्य आहेत.’
युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या घोषणेमध्ये, भारताची प्रमुख एअरलाइन्स एअर इंडियाने शुक्रवारी जाहीर केले की, ते 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारी रोजी युक्रेनच्या बोरिस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारत-युक्रेन दरम्यान 3 उड्डाणे चालवतील. एअर इंडियाचे बुकिंग ऑफिस, वेबसाइट, कॉल सेंटर आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट यांच्यामार्फत बुकिंग सुरू आहे, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
युक्रेनमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी त्या देशातून भारतीयांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी, द्विपक्षीय हवाई बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि पूर्व युरोपीय राष्ट्रांदरम्यान चालवल्या जाणाऱ्या फ्लाइटच्या संख्येवरील निर्बंध हटवले आहेत. विशेषतः मंत्रालयाने एअर बबल व्यवस्थेअंतर्गत भारत आणि युक्रेन दरम्यानच्या फ्लाइट्स आणि सीटच्या संख्येवरील निर्बंध हटवले आहेत. (हेही वाचा: Russia-Ukraine Conflict: जर्मनीकडून आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याच्या सुचना)
युक्रेनमध्ये सध्या 20,000 पेक्षा जास्त भारतीय आहेत ज्यात 18,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी युक्रेनमधील भारतीय नागरिकांना रशियासोबतच्या तणावावरून, त्या देशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन माहिती आणि मदत देण्यासाठी एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने पूर्व युरोपीय देशातील भारतीयांसाठी 24 तास हेल्पलाइन देखील सुरू केली आहे.