COVID 19 Treatment: जामखेडमध्ये खाजगी रुग्णालयात रेमडेसीवीर च्या तुटवट्यावर मात करत डॉक्टरांनी राबवली खास उपचार पद्धती; 'मॉडेल उपचार पद्धती' म्हणून विचार व्हावा यासाठी रोहित पवारांचे पत्र

दरम्यान या औषधोपचारांची माहिती आमदार रोहित पवारांनी घेतली आहे आणि सध्या राज्यातील इतर रूग्णांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो का? याबाबत तज्ञांनी विचार करावा असं आवाहन देखील केले आहे.

NCP MLA Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रासह देशभर मागील काही दिवस कोविड 19 रूग्णांच्या नातेवाईकांची मेडिकल स्टोअर बाहेर लांबच लांब रांग पहायला मिळत आहे. अनेकजण रेमडेसीवीर मिळावं म्हणून वणवण करत आहेत. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अनेकजण काळजीत आहेत. अशामध्येच आता जामखेडच्या एका हॉस्पिटल मध्ये खास उपचारपद्धतीने रूग्णांवर औषधोपचार करून त्यांना कोविडमुक्त करण्यासाठी मदत होत  असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या औषधोपचारांची माहिती आमदार रोहित  पवारांनी घेतली आहे आणि सध्या राज्यातील इतर रूग्णांसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो का? याबाबत तज्ञांनी विचार करावा असं आवाहन देखील केले आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडीयात शेअर केलेल्या पोस्टनुसार,  ऑक्सिजन थेरपी, विटामिन, स्टेरॉइड, ब्लड थिनर्सची एकत्रितपाने योग्य पद्धतीने उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षण ‘कोविड टास्क फोर्स’मधील डॉक्टरांनीही नोंदवलं  आहे. जामखेड मध्ये आरोळे हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर मधील डॉक्टरांनी स्वतंत्र उपचार पद्धती राबवत आणि रेमडेसीवीरचा कमीतकमी वापर करत सुमारे 3700 कोरोना रूग्ण कोविडवर मात करून पुन्हा पायावर उभे राहिले आहेत.  त्यामुळे आता या उपचार पद्धतीचा मॉडेल उपचार पद्धती म्हणून विचार करून त्याचा राज्यभर वापर  करता येईल का? याबाबत तज्ञांनी विचार करावा असं आवाहन केले आहे. दरम्यान याची माहिती त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील दिली आहे.

रोहित पवार  ट्वीट

सध्या महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. काल रात्री आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे तर राज्यात  एकूण 620060 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे.