देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारवरील टीकेला रोहित पवार यांचं प्रत्युत्तर

या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Rohit Pawar & Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) कहर सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. राज्य सरकार कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोविड लढ्यात पंतप्रधानांनी राज्याचं कौतुक केलं असल्याने विरोधकांनी राजकीय टीका न करता सर्वांनी एकत्रितपणे हा लढा लढुया, असं म्हटलं आहे.

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!"

पुढे ते लिहितात, "आणि कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!"

रोहित पवार ट्विट:

मुंबईतील कोविड मृत्यूंची आकडेवारी लपवली जात आहे. चाचण्यांमध्येही तडजोडी करत संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. यामुळे प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास येण्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. (Covid-19 Vaccination नियोजनातील विस्कळीतपणा टाळण्यासाठी रोहित पवार यांनी सूचवला 'हा' पर्याय)

दरम्यान, राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन काल मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा झाली. त्यावेळेस मोदी सरकारने कोविड लढ्याबाबत राज्य सरकारचं कौतुक केलं. यावरुन आता पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.