Rohit Patil Hunger Strike: रोहित पाटील, सुमन पाटील यांचं उपोषण मागे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मागण्यांची दखल

तसेच या टेंबू प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

Rohit Patil | (Photo credit: Archived, edited, representative images

दिवंगत नेते आर आर पाटील यांचा लेक रोहित पाटील टेंभू पाणी योजनेच्या विस्तारीकरणासंबंधित मागण्यांसाठी उपोषणाला बसला होता. मात्र आज राज्य सरकार कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. रोहित पाटील यांच्यासोबत त्यांच्या आई आणि आमदार सुमनताई पाटील देखील होत्या. दरम्यान आश्वासनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आज ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाच्या हस्ते सुमन पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर आणि सांगलीचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सोमवार पासून आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. अंगात ताप असताना आणि प्रकृती ठीक नसताना रोहित पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली होती. अशा परिस्थितीत त्यांनी त्यावर ठाम राहण्याचाही निर्धार केला होता पण उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फोन करून त्यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

त्यामुळे उपोषणाच्या दुसर्‍याच दिवशी त्याची सांगता झाली आहे.

सांगलीच्या तासगावामधील गावांना पाण्यासाठी एका महिन्यात प्रशासकीय मान्यता देऊ असं आश्वासन फडणवीसांनी रोहित पाटील यांना दिलं आहे. तासगाव तालुक्यातील 8 आणि कवठेमंहाकाळ तालुक्यातील 9 गावांचा टेंभू योजनेत सहभागी व्हावा. तसेच या टेंबू प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी अशी त्यांची मागणी आहे. जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी एक महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे लेखी पत्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्याकडून आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. या विस्तारीत योजनेसाठी 8 टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील 34 गावांना त्याचा लाभ होणार आहे.