शिवसेना खासदार संजय राऊत यांना किमान 'सामना' चे संपादक पद द्यायला हवे होते- रिपब्लिकन नेते रामदास आठवले

मात्र आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) वृत्तपत्राचे संपादक पद रश्मी ठाकरे यांना देण्यात आले आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेनेने (Shiv Sena) भाजप सोबत युती तोडत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत हातमिळवणी केल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन केली. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची कमान देण्यात आली. तर शिवसेनेची बाजू नेहमीच ठाम मांडणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मोठा हातभार आहे. मात्र आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या (Saamana) वृत्तपत्राचे संपादक पद रश्मी ठाकरे यांना देण्यात आले आहे. यामुळे पक्षाने संजय राऊत यांच्यावर अन्याय केल्याचे रिपब्लिकन नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी असे म्हटले की, रविवारी सामाना या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक पद रश्मी ठाकरे यांना देण्यात आले. ही चांगली बाब आहेच पण संजय राऊत यांना संपादकाचे पद द्यायला हवे होते असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे असते तर चित्र काहीसे वेगळे असले असते असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.(‘सामना’ च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती, शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक)

तर रश्मी ठाकरे यांनी 1 मार्चपासून संपादकपदाची जबाबदारी सांभाळण्यास घेतली आहे. यापूर्वी खुद्ध उद्धव ठाकरे मुखपत्राचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे यापूर्वी अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. संपादक हे पद लाभाचं पद असल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी येत असल्याने सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे.