पतीच्या अपघाती निधनानंतर एका वर्षात पुर्नविवाह करणाऱ्या महिला नुकसान भरपाई मागण्यास पात्र; मुंबई उच्च न्यायालयाचा विमा कंपन्यांना निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने विधवा महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय दिला आहे. आता एखाद्या महिलेच्या पतीचे अपघाती निधन झाल्यास मृत व्यक्तीच्या पत्नीने एका वर्षात दुसरा विवाह केला तरीदेखील ती महिला नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असणार आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. विम्याची रक्कम मिळण्यासाठी या महिलेला तिच्या वैवाहिक स्थितीत बदल करण्याची आवश्यकता नाही. पुर्नविवाह करणारी महिला नुकसान भरपाई मागण्यास पात्र असणार आहे.
21 फेब्रुवारी 2007 रोजी सकाळी 6.30 वाजता महेंद्र सोनवणे आपल्या आईसह मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात महेंद्र आणि त्यांची आई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महेंद्र यांच्या पत्नीने मोटार अपघात न्यायाधिकरण (एमएसीटी) कडे विम्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, महेंद्र यांच्या पत्नीला महिन्याला दीड लाखाहून अधिक पगार असल्याचे त्यांनी न्यायाधिकरणाला सांगितले होते. त्यानंतर न्यायाधिकरणाने सुषमा यांच्या बाजूने निकाल देत न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि ड्रायव्हरला नुकसान भरपाई देण्यास आदेश दिले. (हेही वाचा - 'पोलिसांचा लोगो-पाटी' खासगी वाहनांवर लावल्यास होणार कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश)
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या महेंद्र सोनवणे यांची विधवा पत्नी सुषमा यांनी विमा मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, सुषमा पतीच्या उत्पन्नावर अवलंबून नसल्याने संबंधित विमा कंपनीने त्यांना विमा भरपाई मिळण्यास पात्र नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, हा युक्तिवाद नाकारतांना कोर्टाने सुषमा यांचा अर्ज महेंद्र यांच्या मृत्यू झालेल्या तारखेवर अवलंबून असल्याचे सांगत त्यांना विम्यासाठी पात्र ठरवण्याचा निर्देश दिला. न्यायमूर्ती आरडी धानुका यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे. तसेच न्यू इंडिया अॅश्युरन्स व अन्य एकाला या अपघातास जबाबदार असलेल्या विधवेला 29 लाख 51 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.