Temples Reopen in Maharashtra: नवरात्रीच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुली होणार धार्मिक स्थळं; 'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य

यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

नवरात्रीच्या (Navratri) मुहुर्तावर राज्यातील धार्मिक स्थळं (Religious Places) भाविकांसाठी खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्यासाठी भाविकांना काही नियमांचे पालन करावे लागणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर बंद असलेली मंदिरं पुन्हा खुली करण्याच्या निर्णयामुळे भाविकांसह मंदिर व्यवस्थापनांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यासाठी मास्क घालणे, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर यांसारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

MAHARASHTRA DGIPR Tweet:

मंदिरं, धार्मिक स्थळं खुली करण्याची मागणी विरोधी पक्षांसह नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. यासाठी भाजपकडून 'शंखनाद आंदोलन'ही करण्यात आले होते. तसंच बार, पब सुरु करुन मंदिरं बंद ठेवल्यामुळे राज्य सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविद्यालयं सुरु करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. त्यानंतर आता धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्वपदावर आणण्याच्या दिशेने राज्य सरकार पाऊलं उचलत असल्याचे दिसून येते.