PMC बँक खातेदारांना दिलासा; 78 टक्के ग्राहक काढू शकतात पूर्ण रक्कम, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती
अशाप्रकारे अर्थमंत्र्यांनी बँकेच्या खातेदारांना फार मोठा दिलासा दिला आहे.
महाराष्ट्रातील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (PMC) घोटाळ्यानंतर, आरबीआयने (RBI) बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घातले. या निर्बंधानुसार गेल्या काही महिन्यांपर्यंत तुम्ही 10 हजार, 25 हजार, 40 हजार व आता 50 हजारापर्यंतची रक्कम काढू शकत होतात. मात्र आता पीएमसी खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेचे 78 टक्के खातेदार आपली पूर्ण रक्कम बँकेतून काढू शकतात. अशाप्रकारे अर्थमंत्र्यांनी बँकेच्या खातेदारांना फार मोठा दिलासा दिला आहे.
काल लोकसभेत बोलताना निर्मला सीतारमण यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे नमूद केले आहे की, या बँकेशी निगडीत प्रवर्तकांची संलग्न मालमत्ता काही विशिष्ट अटींनुसार आरबीआयला दिली जाऊ शकते. जेणेकरून त्या मालमत्तांचा लिलाव करून पैशांची उभारणी केल जाऊ शकेल आणि ठेवीदारांना पैसे देता येतील. ज्या 78 टक्के लोकांना पूर्ण पैसे काढण्याची परवानगी दिली आहे त्यामध्ये मुख्यत्वे छोट्या ठेवीदारांचा समावेश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बँकेच्या बर्याच लहान ठेवीदारांच्या चिंतेचे निराकरण झाले आहे. (हेही वाचा: PMC बँक खातेदारांना दिलासा; वैद्यकीय, शिक्षण, विवाह यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत ठेवीदार काढू शकतात 1 लाख रुपये)
साधारण 24 सप्टेंबर रोजी, आरबीआयने पीएमसी बँकेच्या पूर्ण कामकाजास प्रतिबंधित करण्यासाठी पावले उचलली होती. त्यानंतर कथित आर्थिक अनियमितता शोधण्यासाठी प्रशासक नेमले. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत (Emergency) बँकेतून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा तशीच ठेवली आहे. वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण, उपजीविका आणि इतर महत्वाच्या समस्या असलेले ठेवीदार, प्रशासकाकडे 1 लाख रुपये काढण्याचा अर्ज देऊ शकतात. प्रशासक योग्यतेनुसार त्या अर्जाचा निर्णय घेईल. तर सामान्य स्थितीत काढण्यात येणाऱ्या पैशांची मर्यादा अद्याप 50 हजार रुपये आहे.