Pune IAS Officer Pooja Khedkar Transfer: पुण्यातील प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिमला बदली; श्रीमंतीत जगण्याचा नाद पडला भारी
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणामुळे आणि कोड ऑफ कंडक ना पाळल्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित पूजा खेडकर यांची तक्रार केली होती.
Pune IAS Officer Pooja Khedkar Transfer: पुण्यात प्रशिक्षणार्थी असलेल्या सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर( Pooja Khedkar) यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तणामुळे आणि कोड ऑफ कंडक ना पाळल्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित पूजा खेडकर यांची तक्रार केली होती. त्यावर कारवाई करत त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पूजा खेडकर 3 जून रोजी पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याची लिस्ट दिली होती. त्याशिवाय त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिवा लावला होता. या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. (हेही वाचा:Mumbai Pune Train Cancelled: जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका; पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड,डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द )
पूजा खेडकर 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. नियमांनुसार, कोणत्याही आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांची जंत्रीच सुरू केली. यात त्यांचे वडिलांचाही सहभाग आहे. ज्यात स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान व शिपाई या मागण्यांचा समावेश आहे. त्यानंतर खासगी वाहनावर अंबर दिवा लावला. तो दिवसादेखील चालू ठेवला होता. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटीचेंबर देखील त्यांनी बळकावल्याचे जिल्हाधिकारी यांनी सचिवांकडे लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. तक्रारीत त्यांनी पूजा खेडकर यांच्या मागण्यांच्या यादीचे whatsapp चॅट पुरावे म्हणून जोडले आहे.
पूजा खेडकर कोण आहे?
पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील त्या रहिवाशी आहेत. माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या त्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी होते.