RBI Cancelled Cooperative Bank License: रिझर्व्ह बँकेने दिली मोठी माहिती; 22 सप्टेंबरपासून 'या' बँकेतील ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत
ग्राहकांकडे 22 सप्टेंबरपर्यंतच वेळ आहे.
RBI Cancelled Cooperative Bank License: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) वेळोवेळी देशातील अनेक बँकांना नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड आकारते. आरबीआयने आतापर्यंत अनेक बँकांचे परवाने रद्द केले आहेत. आता या यादीत आणखी एका सहकारी बँकेचे नाव जोडले गेले आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Rupee Co-operative Bank Limited) लवकरच बंद करण्यात येईल, असा आदेश आरबीआयने दिला आहे. ग्राहकांकडे 22 सप्टेंबरपर्यंतच वेळ आहे. या बँकेत खाते असलेल्या ग्राहकांनी लवकरात लवकर आपल्या खात्यातून पैसे काढावेत. कारण, 22 नंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होणार आहेत. (हेही वाचा -Bank Holidays in September 2022: सप्टेंबर महिन्यात 13 दिवस बंद राहतील बँका; येथे पहा सुट्ट्यांची यादी)
भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच पुणेस्थित रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर 22 सप्टेंबर रोजी बँक पूर्णपणे बंद राहणार आहे. यापूर्वीही अनेक बँकांची बिकट आर्थिक स्थिती पाहता त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
RBI ने सांगितले आहे की, 22 सप्टेंबर नंतर बँकेचे ग्राहक कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. या बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने आरबीआयने पुणेस्थित रुपी सहकारी बँक लिमिटेड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडे भांडवल आणि कमाईचे कोणतेही साधन उरले नाही. अशा परिस्थितीत आरबीआयने या बँकेचा परवानाच रद्द केला आहे.
दरम्यान, ज्या ग्राहकांचे पैसे रुपी सहकारी बँक लिमिटेडमध्ये जमा आहेत. त्यांना 5 लाखांच्या ठेवींवर विमा संरक्षण मिळते. DICGC ही रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे. जी सहकारी बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. खातेधारकाच्या 5 लाखांच्या ठेवीवर, DICGC त्याला संपूर्ण विमा दावा देते.