NCP नेते राजेश विटेकर यांच्यावर बलात्काराचा आरोप; लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची पिडीतेची माहिती
यानंतर सध्या तरी विटेकर यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे असे ते म्हणाले आहेत
धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजून एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. राजेश विटेकर (Rajesh Vitekar) असे या राष्ट्रवादी नेत्याचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते असलेले राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षही आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे या पिडीत महिलेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला. शरद पवार यांच्या नावाची धमकी देऊन विटेकर यांनी आपल्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पीडित व्यक्तीच्या मते, विटेकर म्हणाले होते की, शरद पवारांचा हात माझ्या डोक्यावर आहे त्यामुळे माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही.
पीडित महिलेने गुरुवारी पुणे शहरातील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ति देसाई यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत हे गंभीर आरोप केले. या आरोपानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा डागाळली आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये महिलेने आरोप केले आहेत की, ‘वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचे अमिष दाखवून माझे लैंगिक शोषण केले गेले. शरद पवार यांच्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, असे राजेश विटेकर म्हणतात. याबाबत आपण तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनलाही गेलो होतो मात्र तिथे उडवा उडवीची उत्तरे मिळाली.’ (हेही वाचा: Aurangabad: कोरोना नियम पायदळी तुडवल्याने एमआयएम खासदार Imtiaz Jaleel यांच्याविरोधात गुन्हा दाखल)
राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असा आरोप तृप्ती देसाईंनी केला. यानंतर सध्या तरी विटेकर यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे असे ते म्हणाले आहेत. तसेच आपल्या वकिलांशी चर्चा करून उद्या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर बोलेन असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यासारख्या नेत्यांवर बलात्काराचा आरोप झाला होता. धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या बाजूने स्पष्टीकरण दिले होते. नंतर महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध आपली तक्रार मागे घेतली. नुकतेच राज्यात संजय राठोड प्रकरणही गाजले होते. शेवटी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.