Sanjana Jadhav Accident: रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा कार अपघात; चाळीसगाव तालुक्यात घडली दुर्घटना
संजना जाधव, कृषी बाजार समितीचे उपाध्यक्ष जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह बनोटी सर्कलमधील वरठाण येथे जात होते.
Sanjana Jadhav Accident: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे (Raosaheb Danve) यांची कन्या व माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव (Sanjana Jadhav) यांचा सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ कार अपघात (Car Accident) झाला. सुदैवाने या घटनेतून संजना जाधव यांच्यासह चालक व इतर प्रवासी सुखरूप बचावले. संजना जाधव, कृषी बाजार समितीचे उपाध्यक्ष जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह बनोटी सर्कलमधील वरठाण येथे जात होते.
रांजणगाव फाटा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप ट्रकची (MH-42 BF-0613) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात कोणतीही जीवितहाणी झाली नसून सुदैवाने संजना जाधव आणि त्यांचा कार चालक सुखरुप बचावले आहेत. याशिवाय, संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा - Mumbai Accident: मरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात, कारने भरधाव दुचाकीला उडवले (Watch Video))
संजना जाधव या राजकारणात सक्रीय असून त्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी होत्या. परंतु, कौटुंबिक कलहानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव याचा घटस्फोट झाला आहे. आगामी कन्नड विधानसभा निवडणुकीत दोन्ही पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. परंतु, अद्याप याबाबात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा -Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी दाखल केला पुरवणी अंतिम अहवाल; अल्पवयीन आरोपींविरुद्ध पुरावे नष्ट करणे, बनावटगिरी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल)
दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी माजी आमदार नितीन पाटील यांच्या वाहनालाही छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना वेरूळजवळ अपघात झाला होता. या अपघातात माजी आमदार थोडक्यात बचावले. या अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाला होता. तसेच नितीन पाटील यांच्या कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.