IPL Auction 2025 Live

Ramdas Athawale On Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

त्यावेळी ‘हम दो और हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

Rahul Gandhi, PM Modi, Ramdas Athawle (Photo Credit: PTI)

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत मोदी सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला होता. त्यावेळी ‘हम दो और हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीदेखील राहुल गांधीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘हम दो, हमारे दो’ हा जो नारा आहे, तो राहुल गांधी यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यांनी लग्न ‘हम दो हमारे दो’ अशा पद्धतीने करावे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले की, कृषी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्थ नाही. राहुल गांधी हे शेतकरी आंदोलनाला चुकीची दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदा आणलेला आहे. या कायद्यानुसार, शेतकरी आपल्या मालाची वाटेल त्या ठिकाणी विक्री करू शकतो. शेतकऱ्यांमुळे आम्हाला खायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील हा कायदा नाही. मात्र, विरोधकांकडून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक- शरद पवार

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात हरियाणा, पंजाब, येथील शेतकरी गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर अंदोलन करत आहेत. कृषी कायद्या रद्द करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, हा कायदा शेतकऱ्यांचा हितासाठी आहे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र, या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे, असे मत विरोधकांचे आहे.