रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदेंनी दाखल केली याचिका; न्यायालयाने समन्स बजावत दिला 13 फेब्रुवारीपर्यंत मत मांडण्याचा आदेश
मात्र आता त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उभा करत, तिला आव्हान दिले गेले आहे
पवार घराण्यातील रोहित पवार (Rohit Pawar) 2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवडणू गेले. मात्र आता त्यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह उभा करत, तिला आव्हान दिले गेले आहे. रोहित पवार यांच्याविरोधात राम शिंदे (Ram Shinde) यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने रोहित पवार यांना समन्स बजावत, येत्या 13 फेब्रुवारीपर्यंत आपले मत मांडण्याचा आदेश दिला आहे.
आपल्या याचिकेमध्ये राम शिंदे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा यातील सर्वात मोठा आरोप.
तसेच, रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला, सोशल मीडियात हेतूपुरस्सर राम शिंदेंची बदनामी केली असे आरोपही राम शिंदे यांनी केले आहेत. याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 'ही याचिका नक्की काय आहे याबद्दल आम्हाला काही माहिती नाही. जेव्हा ते सविस्तर समजेल तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचे याचा निर्णय घेतला जाईल. मुळात विजय आणि पराजय हा मोठ्या मनाने स्वीकारायला हवा. मात्र याबाबत जे कोर्टात गेले त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल, तसा आमचाही आहे, त्यामुळे तिथेही सत्याचाच विजय होईल.' (हेही वाचा: किर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार? गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन' फॉर्म्युल्यासंदर्भात केलं 'हे' वादग्रस्त विधान)
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र, याच निवडणुकीत राम शिंदे रोहित पवार यांच्याविरोधात पराभूत झाले होते. राम शिंदे हे मोठे नेते आहेत, याआधी त्यांनी जनतेसाठी बरीच कामेही केली आहेत. मात्र असे असूनही एक नवीन मुलगा येऊन निवडणूक जिंकतो ही गोष्ट त्यांच्या पचनी पडली नाही. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप झाले म्हणूनच पवार ही निवडणूक जिंकू शकले असे शिंदे यांचे म्हणणे आहे.