Rajya Sabha Bypolls 2021: राज्यसभा पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या जागी महाराष्ट्रातून काँग्रेस कोणाला देणार उमेदवारी?
ही जागा काँग्रेसकडे (Congress) असल्याने निवडणूक जर बिनविरोध झाली तर राज्यसभेवर सहज जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (Rajya Sabha Bypolls 2021) कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 4 ऑक्टोबरला निवडणुका पार पडतील. या निवडणुका महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) आदी राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी असणार आहेत. काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांचे निधन झाल्यामुळे रिक्त जागेसाठी महाराष्ट्र काँग्रेसमधून मोठी चुरस आहे. ही जागा काँग्रेसकडे (Congress) असल्याने निवडणूक जर बिनविरोध झाली तर राज्यसभेवर सहज जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे.
राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात. त्यांच्यावर गुजरात काँग्रेस प्रभारी पदाचीही जबाबदारी होती. एप्रील 2020 मध्ये ते राज्यसभेवर निवडूनही गेले. मात्र कोरोना व्हायरस संसर्गाने 16 मे 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागेसाठी आता पोटनिवडणूक जाहीर झाली. सातव यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता. त्यामुळे या जागेवर निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षे काम करता येणार आहे. त्यामुळे ही जागा कायम ठेवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षात मोठी हालचाल आहे.
राज्यसभा पोटनिवडणूक कार्यक्रम
- 15 सप्टेंबर- अधिसूचना जारी होईल
- 12 सप्टेंबर- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
- 23 सप्टेंबर- दाखल उमेदवारी अर्जांची छाननी
- 27 सप्टेंबर- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
- 04 ऑक्टोबर- मतदान आणि मतमोजणी
कोणाच्या नावाची चर्चा?
राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. रजनी सातव यांची निवड करावी अशी काँग्रेसमधीलच एका गटाची मागणी आहे. मात्र, अलिकडेच त्यांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कार्यकारणी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा काहीशी मागे पडली आहे. दरम्यान, आता जेष्ठ नेते काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. मात्र, या चर्चांना अद्याप तरी पुष्टी मिळू शकली नाही. दरम्यान, डॉ. रजनी सातव, मुकुल वासनिक यांच्याशिवाय अविनाश पांडे, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांचीही नावे जोरदार चर्चेत आहेत. पक्षश्रेष्टी कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात यावर एका जागेवर कोणाची निवड होणार हे ठरणार आहे.