Rajya Sabha Bypolls 2021: राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
काँग्रेस नेते राजीव सातव यांचे नुकतेच कोरोनामळे निधन झाले. त्यामुळे राजीव सातव (Rajeev Satav) यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपा संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांना उमेदवारी देणार आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Bypolls 2021) महाराष्ट्रातील भाजप (Maharashtra BJP) उमेदवार देणार आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांचे नुकतेच कोरोनामळे निधन झाले. त्यामुळे राजीव सातव (Rajeev Satav) यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपा संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांना उमेदवारी देणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संजय उपाध्याय हे भाजपचे उमेदवार असणार असून, 22 सप्टेंबरला ते सकाळी 11 वाजता निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
संजय उपाध्याय हे भाजप युवा मोर्चाचे जुने कार्यकर्ते आहेत. काही काळ ते भाजप प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत होते. सध्या त्यांच्याकडे मुबई सरचिटणीसपद आहे. उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठविणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या घोषणेमुळे ही चर्चा खरी असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Rajya Sabha Bypolls 2021: राज्यसभा पोटनिवडणूक जाहीर, राजीव सातव यांच्या जागी महाराष्ट्रातून काँग्रेस कोणाला देणार उमेदवारी?)
दरम्यान, राजव सातव यांच्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाराष्ट्रातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देते याबाबत जोरदार उत्सुकता आहे. राजीव सातव यांच्या जागी त्यांच्या पत्नी डॉ. रजनी सातव यांची निवड करावी अशी काँग्रेसमधीलच एका गटाची मागणी आहे. मात्र, अलिकडेच त्यांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कार्यकारणी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा काहीशी मागे पडली आहे. दरम्यान, आता जेष्ठ नेते काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. मात्र, या चर्चांना अद्याप तरी पुष्टी मिळू शकली नाही. दरम्यान, डॉ. रजनी सातव, मुकुल वासनिक यांच्याशिवाय अविनाश पांडे, मिलिंद देवरा, संजय निरुपम यांचीही नावे जोरदार चर्चेत आहेत. पक्षश्रेष्टी कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात यावर एका जागेवर कोणाची निवड होणार हे ठरणार आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक (Rajya Sabha Bypolls 2021) कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 4 ऑक्टोबरला निवडणुका पार पडतील. या निवडणुका महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), आसाम (Assam), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) आदी राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी असणार आहेत.