महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या यादीमधून Raju Shetti यांचं नाव वगळलं? पहा यावर NCP प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांनी दिलेली प्रतिक्रिया!
आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. शिवसेना,एनसीपी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर (Maharashtra Vidhan Parishad) नियुक्त 12 आमदारांच्या नावाची यादी सध्या पुन्हा चर्चेमध्ये आहे. या यादीमधून राष्ट्रवादी राजू शेट्टींना (Raju Shetti) डच्चू देत हेमंत टकलेंची (Hemant Takle) वर्णी लावल्याची चर्चा आहे पण या सार्या प्रकरणावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना 'कोणाचेही नाव वगळ्यात आलेले नाही' असं स्पष्ट केले आहे. जळगाव मध्ये चाळीसगावसह पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करताना जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. (नक्की वाचा: Maharashtra Legislative Council: 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खोचक प्रतिक्रिया).
'राज्यात विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत कुणाचेही नाव वगळलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपालांना विनंती केलेली आहे. शिवसेना,एनसीपी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या सहमतीनेचं राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर राज्यपालांनी लवकर निर्णय घावा अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत, असे महाराष्ट्रातील जनतेला आता वाटायला लागले आहे. खूप वेळ झाला त्याच्यावरचा निर्णय अद्याप झालेला नाही.' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान मागील काही दिवसांपासून राजू शेट्टींच्या ऐवजी हेमंत टकलेंची वर्णी लागू शकते अशा बातम्या येत असल्याने आज एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राजू शेट्टींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा की खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशारा मात्र राजू शेट्टींनी यावेळी राष्ट्रवादीला दिला आहे.
राजू शेट्टी हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार आहेत. त्यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी असे एनसीपीने राज्यपालांना पाठवलेल्या 12 जणांच्या यादीमध्ये म्हटलं आहे.