Raj Thackeray On NCP Political Crisis: सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य नाही- राज ठाकरे
राजकारणातील या नेत्यांना देशातील मतदारांचे काही घेणे नाही असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे भूमिका मांडल्यानंतर आज पुन्हा पत्रकार परिषदेतही महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर भाष्य केले. शिवसेना पक्षातील फूट, त्यानंतर आता अजित पवार यांनी केले बंड आणि भाजपसोबत स्थापन केलेली सत्ता. या सर्व प्रकाराचे वर्णन राज ठाकरे यांनी 'किळसवाणे राजकारण' अशा शब्दांत केले. तसेच, आज शरद पवार यांनी काहीही भूमिका घेतली तरी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचा निर्णय उगाचच झाला असेल का? असा सवाल उपस्थित करत उद्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या देखील केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. (हेही वाचा -NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार कराडकडे रवाना, अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात उलथापालत)
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपण लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती देखील दिली. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वच पक्षांवर सडकून टिका केली. कोण कुठल्या पक्षासोबत आहे, हे सध्या कळत नाही स्वत:च्या स्वार्थासाठी वाटेल ते करत आपल्या मतदारांनी आपल्याला का निवडून दिले हे विसरायचे असे घाणरडे राजकारण सध्या राज्यात सुरु असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
मला असं वाटतं लोकांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसात मेळावा आणि बैठक घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं आहे. लवकरच पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरा सुरु होईल. त्यावेळी जागोजागी जाऊन लोकांना भेटेन.