Mumbai Local प्रवासादरम्यान नियम मोडल्यास होणार कारवाई
त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
सर्वसामान्यांना मुंबई लोकलने (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने आणि रेल्वेने ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेस प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी 188 (IPC 188) आणि रेल्वे कायदा याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले आहे.
1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवास सुरु झाल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण 2650 सुरक्षा रक्षकांची टीम पुरवण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांचा समावेश असेल. तसंच सायंकाळच्या वेळेस सर्व महिला डब्यांमध्ये रेल्वे पोलिस नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कोणतेही अडचण भासल्यास रेल्वे पोलिसांना संपर्क करण्यासाठी 1512 हा हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनही सज्ज झालं आहे. सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम तयार करण्यात आली असून एन्ट्री-एक्सिट पॉईंट्स, तिकिट बुकिंग काऊन्टर्स वाढण्यात आली आहेत. तसंच गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत. (Mumbai Local सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी; सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम सज्ज)
सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल प्रवासाचा बहुप्रतिक्षित निर्णय काल राज्य सरकारने जाहीर केला. त्याला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र वेळेचे बंधन आणि कोरोना संबंधित नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.