रेल्वेकडून प्रवाशांसाठी भेट; 'कोकण रेल्वे' मार्गावर उभी राहणार नवी 10 स्टेशन्स

याशिवाय कोकण रेल्वे प्रशासन आणखी 21 स्थानके बनविण्याच्या तयारीत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

कोकण रेल्वेला महाराष्ट्राची लाइफलाईन म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणमार्गे दक्षिणेत उतरण्यासाठी एक महत्वाचा मार्ग म्हणजे ‘कोकण रेल्वे’. मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी कोकणातील हजारो चाकरमानी काम करतात. त्यांच्यासाठी तर ‘कोकण रेल्वे’ हे एक वरदान आहे. मात्र या मार्गावर दोनच मार्गिका आहेत. सुट्टीच्या काळात या मार्गावर ज्यादा गाड्या सोडल्या असता वाहतूकही फारच विस्कळीत होते. म्हणूनच आता या मार्गावर नवी 10 स्टेशने बांधली जाणार आहेत. याशिवाय कोकण रेल्वे प्रशासन आणखी 21 स्थानके बनविण्याच्या तयारीत आहे.

सध्या कोकणात रेल्वेमार्गावर एकूण 67 स्टेशन्स आहेत. त्यात आता इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, कालबनी, कडवई, वेरवली, खारेपाटण, अर्चिणे, मिरजन, इनजे या नव्या 10 स्टेशनची भर पडणार आहे. याच सोबत कोकण रेल्वेमार्गावरील प्रवास सोईस्कर करण्यासाठी विद्युतीकरण, दुहेरीकरण आणि क्रॉसिंग स्थानक (जेथे रूळ एकमेकांना छेदतात) या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा वेळ वाचवणे, कोकण रेल्वेचा प्रवास सुकर होणे यासाठी रेल्वे प्रशासन अनेक योजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर ही नवी दहा क्रॉसिंग स्थानके बनविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या वर्षात ही स्थानके प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या प्रकल्पाचा खर्च 202 कोटी रुपये आहे. याचसोबत या वर्षाच्या डिसेंबरअखेरीपर्यंत रोहा ते वीर दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. तर विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण होणार आहे.