Rahul Narvekar on Maharashtra Political Crisis: 'लवकरच क्रांतीकारक निर्णय घेणार', राहुल नार्वेकर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता
आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकर यांनी सूचित केलं आहे.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिल्या आहेत, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या 16 आमदारांचं काय होणार ? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी मोठं विधान केलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकर यांनी सूचित केलं आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं. राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत...दौलतराव श्रीपतराव देसाई' या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राजभवन येथे पार पडला. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे आणि अन्य दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा विषय सध्या विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे.