Rahul Narvekar On MLAs Disqualification: आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची चा निवाडा करावा लागणार - राहुल नार्वेकर

निकाल लवकरात लवकर लावला जाईल पण त्याची घाई केली जाणार नाही असं Rahul Narvekar म्हणाले आहेत.

Rahul Narvekar (PC- Facebook)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या लढाईमध्ये आता 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांच्या हाती आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर या प्रकरणाकडे कसे पाहणार याकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहे. कोर्टातील सुनावणीच्या दरम्यान लंडन मध्ये असलेल्या राहुल नार्वेकर यांनी आता मुंबईमध्ये परतल्यानंतर आपली या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी मीडीयाशी बोलताना त्यांनी आपण कोणत्याही दबावासमोर झुकणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणी कसा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल नार्वेकर यांनी आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत वाचली असून संविधानिक गोष्टींचा विचार करून योग्य वेळेत निर्णय घेऊ असं म्हटलं आहे. निकाल लवकरात लवकर लावला जाईल पण त्याची घाई केली जाणार नाही असं देखील म्हटलं आहे. कोर्टाने 'पुरेशा वेळेत' निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रकरणास्वरूप कोणाला किती वेळ लागेल हे वेगवेगळं आहे. त्यामुळे आत्ताच याचा निकाल कधीपर्यंत देणार? याची माहिती देऊ शकत नसल्याचंही नार्वेकर म्हणाले आहेत.

आमदारांच्या अपात्रतेच्या निकालापूर्वी जुलै 2022 मध्ये नेमकी शिवसेना कोणाची होती? याचा निर्णय आधी घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सुरूवात शिवसेना कुणाची इथपासून असेल असे देखील नार्वेकर म्हणाले आहेत. भरत गोगावले यांच्या 'प्रतोद' पदावरील आक्षेप देखील सर्वोच्च न्यायालयाने बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता एकदा पक्ष कोणाचा हे ठरलं की पुढील निर्णय घेतले जातील असे नार्वेकर म्हणाले आहेत. Uddhav Thackeray on Assembly Speaker: 'वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या', उद्धव ठाकरे यांचे शिंदे-फडणवीस आणि भाजपला थेट आव्हान .

ठाकरे गटाकडून 15 दिवसांमध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पण नार्वेकर यांनी अद्याप याबाबत आपल्याला कोणतेही पत्र मिळालं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदारांनी आपलं पत्र नार्वेकरांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिलं आहे.