Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधी अर्बन नक्षलवाद्यांचा विळखा, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात? देवेंद्र फडणवीस यांची टीका

भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणाता संकेत आणि संदेश देतात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis | Twitter/ANI

विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly elections 2024) मध्ये महाविकासआघाडी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज महाराष्ट्रात येत आहेत. नागपूर येथे त्यांची सभा पार पडत आहे. या सभेपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांना अर्बन नक्षलवादी (Urban Naxals) आणि तत्सम संघटनांनी घेरले आहे. भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणाता संकेत आणि संदेश देतात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

'भारत जोडो यात्रा डाव्या विचारांच्या संघटनांचा समूह'

देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी काढलेली 'भारत जोडो' यात्रा हा डाव्या विचारांच्या संघटनांचा समूह होता. या संघटनांचा विचार, कामाची पद्धत आणि ध्येय हे अराजकता माजवने हेच आहे. हेच लोक राहुल गांधी यांच्याही आजूबाजूला आहेत. ते नेहमी राज्यघटनेचा उल्लेख करतात आणि लाल रंगाचे पुस्तक दाखवतात. आपली राज्यघटना ही निळ्या रंगाची आहे. पण, लाल रंगाचे संविधान दाखवून तुम्ही कोणाला तुम्ही इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात, अशा शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे.

'फडणविसांनी उपदेशाचे डोस बंद करावेत'

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला महाविकासआघाडीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी म्हटले की, ज्या व्यक्तीचे संपूर्ण राजकारण ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्स यांसारख्या संस्थांच्या दबावातून विरोधकांना नियंत्रित करण्यावर सुरु आहे, जो व्यक्ती स्वत:च दीडशे जवानांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात वावरतो, स्वत:च स्वत:ची सुरक्षा वाढवतो आणि त्याचे कारणही देत नाही, अशा डरोपक व्यक्तीने, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नये. येत्या 23 तारखेला त्यांच्या डोसच्या बाटल्या आपोआप बंद होतील.

काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य हे दूर्दैवी आहे. डाव्या चळवळींमध्ये ओबीसी संघटनाही आहेत. त्यामुळे हा संपूर्ण ओबीसी समूहाचा अपमान आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच आलेल्या नैराश्येतून त्यांनी हे विधान केल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. महाविकासआघाडीला लोकांचा मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची विधाने करत असल्याचे चव्हाण म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif