Pune Traffic Update: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी पुण्यातील रस्ते वाहतूकीत मोठे बदल; पर्यायी मार्ग जाणून घ्या

त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी मंगळवारी 12 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील रस्ते वाहतूकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

Photo Credit- X

Pune Traffic Update: पुणे वाहतूक पोलिसांनी मंगळवारी 12 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एसपी कॉलेज ग्राउंडवर होणाऱ्या रॅलीच्या तयारीसाठी शहरातील रस्ते वाहतूकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना प्रचारासाठी मोदींची पुण्यात सभा होणार आहे. त्यामुळे या हाय-प्रोफाइल इव्हेंट दरम्यान रहदारी प्रवाह सुव्यवस्थित राहण्यासाठीआणि वाहतूक कोंडीचा व्यत्यय कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांवर बंदी घातली आहे. वाहतूक बदलांचे तपशील जाणून घ्या. 

1. केळकर रोड: टिळक चौक ते भिडे ब्रिज जंक्शनपर्यंत वाहतूक एकेरी असेल. प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. झेड ब्रिजवरून डावीकडे वळणे आणि नंतर भिडे ब्रिज जंक्शनवर उजवे वळणे घेणे.

2. गरुड गणपती चौक: गरुड गणपती चौक ते भिडे ब्रिज चौकापर्यंत प्रवेश प्रतिबंधित असेल. बंद टाळण्यासाठी वाहनांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे जावे आणि टिळक चौकात यू-टर्न घ्यावा.

3. डेक्कन ते केळकर रोड: डेक्कनकडून भिडे ब्रिजमार्गे केळकर रोडला जाण्यास बंदी असेल. वाहनचालकांना पर्यायी मार्ग म्हणून रिव्हरसाइड रोड घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

4. एन एस फडके चौक: एन एस फडके चौक ते नाथ पै चौकाकडे प्रवेश बंद राहील. वाहनधारक त्यांच्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी निलयम पूल आणि सिंहगड रोडचा वापर करू शकतात.

5. आंबिल ओढा जंक्शन: बाबुरा घुले रोड मार्गे प्रवेश बंद केला जाईल, जॉगर्स पार्क रोड आणि शास्त्री रोड मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.

सभेदरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी, पुण्यातील सोलापूर रोड, अहमदनगर रोड, आळंदी रोड, जुना पुणे-मुंबई महामार्ग, औंध रोड, बाणेर रोड, पाषाण रोड, पौड रोड, कर्वे रोड, सिंहगड रोड, सातारा रोड, सासवड रोड, लोहेगाव रोड या प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी असेल.