Pune: गणेशोत्सवात नवीन निर्बंध नाहीत, मात्र गर्दी झाल्यास दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेतला जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी आज दिले
सध्या देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. अशात महाराष्ट्रामध्ये काही दिवसांत गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) सुरुवात होणार आहे. या दहा दिवसांमध्ये बाहेर गर्दीचे वातावरण असते. मागच्यावर्षी या उत्सवावर अनके निर्बंध घालण्यात आले होते. आता यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीत, मात्र नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून, प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टने दीड लाख लस दिली, हे कौतुकास्पद आहे. स्वयंसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे. खाजगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. (हेही वाचा: Maharashtra Lockdown: तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू शकतात, सरकारकडून केला जातोय विचार)
तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्र, तिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.