Pune-Solapur Electric Bus: दिलासादायक! लवकरच पुणे-सोलापूर मार्गावर धावणार इलेक्ट्रिक बस; चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू

त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-पुणे इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे.

E Bus Service (Image used for representational purpose | (Photo Credits: File Photo)

महावितरणने वीज जोडणी दिल्यानंतर आता सोलापूर बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या 10 जूनपर्यंत याचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच पहिल्या टप्प्यात सोलापूर-पुणे मार्गावर 10 इलेक्ट्रिक बसेस (Pune-Solapur Electric Bus) धावणार असल्याचे नियोजन विभागाचे नियंत्रक विनोद भालेराव यांनी सांगितले. विभाग नियंत्रक भालेराव म्हणाले की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात येत आहे. कोट्यवधी रुपये इंधनावर खर्च होणार असून प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळणार आहे.

पुणे-अहमदनगर, पुणे-मुंबई आणि इतर काही मार्गांवर सध्या 70 इलेक्ट्रिक बसेस धावत आहेत. आता सोलापूर विभागानेही सोलापूरसाठी 75 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठवला आहे. पंढरपूर व मंगळवेढा यांसाठी प्रत्येकी 25 व सोलापूरसाठी 25 बसेस देण्यात याव्यात, अशी नोंद करण्यात आली आहे.

सोलापूर आगारातील चार्जिंग स्टेशन पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर येथील चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहे. त्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा, मंगळवेढा-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, मंगळवेढा-पुणे इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता 5150 इलेक्ट्रिक बस येणार आहेत. राज्यातील विविध डेपोंमध्ये ई-बसचा वापर वाढण्यासाठी 5150 ई-बसचे टेंडर काढण्यात येणार आहे. सध्या 150 बस तयार करण्याचे काम सुरू असून, त्यापैकी 70 बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. प्रत्येक विभागात चार्जिंग स्टेशन तयार झाल्यानंतर त्यांना बसेस मिळतील. या बसचे तिकीट दर शिवशाही बसप्रमाणेच असतील. बसेसचा दर्जा अतिशय आरामदायी असणार आहे.

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यालाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक 121 इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाची मान्यता मिळाली आहे. त्या लवकरच जिल्ह्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. जळगावसह पाचोरा, चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.