पुणे: कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने शाळांना विशेष सूचना; सध्या शालेय विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती न करण्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे आवाहन
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्रातील पुण्यात काल (9 मार्च) कोरोना व्हायरसचे पहिले दोन रुग्ण आढळून आल्यानंतर शासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी शाळांमध्ये जनजागृती करण्यासाठी पत्रक जारी केले आहे. त्याद्वारे शाळांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती नको, असे यात म्हटले आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी परीपत्रक जारी केले असून त्याद्वारे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरिक्षकांना आवाहन देण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी त्यासंबंधित जनजागृती करणे. विद्यार्थ्यांना श्वसनासंबंधीचे शिष्टाचार पाळायला लावणे, वारंवार हात धुणे, शिंकताना, खोकताना रुमाल किंवा टिश्श्यू पेपरचा वापर करणे, आजारी असताना शाळेत न येणे, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि नाक व तोंडाला वारंवार हात न लावणे इत्यादी गोष्टींची माहिती शाळकरी मुलांना देणे आवश्यक असल्याचे त्यात म्हटले आहे. तसंच आजारी व्यक्तीपासून दूर राहण्याच्या सूचनाही विद्यार्थ्यांना द्या. मात्र शाळकरी मुलांना मास्क घालण्याची सक्ती करु नका, अशा सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन सर्व शाळांना देण्यात आले आहे. (पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IT कंपन्यांच्या 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना)
दुबईहून परतलेल्या पुण्यातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे कालच निदान झाले. या दोघांवरही नायडू रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. हे दाम्पत्य 20-29 फेब्रुवारी दरम्यान दुबईला गेलं होतं. 1 मार्चला ते पुण्यात परतले. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघेही सर्दी, ताप, खोकला यामुळे त्रस्त होते. त्यामुळे त्यांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट्स पॉझिटीव्ह आल्यानंतर दोघांनाही नायडू रुग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.