'मनसे' चा नवा झेंडा वादाच्या भोवर्यात; संभाजी ब्रिगेड कडून स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
मात्र मनसेच्या नव्या झेंड्यांचं अनावरण होताच काही वेळामध्ये संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला आपला निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (23 जानेवारी) 14 वर्षांनी मनसेचा झेंडा बदलला आहे. आज अनावरण करण्यात आलेल्या मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये केवळ केशरी रंग आणि मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा समावेश आहे. मात्र मनसेच्या नव्या झेंड्यांचं अनावरण होताच काही वेळामध्ये संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला आपला निषेध नोंदवला आहे. संभाजी ब्रिगेड कडून स्वारगेट पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेचा वापर राजकारणासाठी करणं चुकीचं असल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडने आपला निषेध नोंदवला आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसं निवेदन पोलीस ठाण्यात दिलं आहे.
शिवरायांची राजमुद्रा राजकारण करण्याचे साधन नाही. त्याचा वापर करून मतांचा जोगवा मागितला जाऊ शकत नाही असेही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासूनच मनसे नवा झेंडा घेऊन येणार असल्याची चर्चा रंगली होती. यावेळी जेव्हा राजमुद्रा असलेला झेंडा येऊ शकतो अशी बातमी समोर आली होती तेव्हा त्यांनी विरोध नोंदवला होता. संभाजी ब्रिगेडने राजमुद्रा ही प्रशासकीय मुद्रा असून त्याचा वापर करण्याचा नैतिक अधिकार राज ठाकरेंना नसल्याचं म्हटलं आहे.
गोरेगाव येथील नेस्लो मैदानामध्ये आयोजित मनसेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आज मनसेच्या झेंड्यांच्या अनावरणासोबतच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची निवड मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.आज दिवसभर चालणार्या या कार्यक्रमामध्ये आता सार्यांचे लक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लागले आहे.