Pune Rains: पुणे शहराला IMD चा आज रेड अलर्ट; धरणांमधून विसर्ग वाढवल्याने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला!

पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Pune Rains | X

आयएमडी ने पुणे (Pune), सातारा (Satara)  जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. त्यामुळे आज नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रामुख्याने मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डेक्कन भागामध्येही नदीच्या पाणीपातळी मध्ये वाढ झाली आहे. मागील वेळेस यामुळेच सिंहगड रोड वर एकता नगर मधल्या दोन सोसायटींमध्ये पाणी शिरलं होतं.

कोयना धरणक्षेत्रामध्ये तसेच पुण्यात खडकवासला, पावना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या मधून विसर्ग सुरू केला जात आहे. सध्या निरा देवघर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या विसर्गात वाढ करून एकूण ७ हजार ६९ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे. खडकवासला धरणसाखळीतील सर्व धरणे भरली धरणातून मुठा नदीपात्रात २७ हजार १६ क्यूसेक विसर्ग तसेच मुळशी धरणातूनही मुळा नदीपात्रात २७ हजार ६०९ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी; अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन. 

खडकवासला धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रस्ता परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपात्र,यासह इतर ठिकाणी दलाचे अधिकारी आवश्यक त्या सूचना देत आहेत.

पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी गणपती मंदिराजवळील पवना नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरात पाणी साचले आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.