Pune Porsche Car Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात शिवानी आणि विशाल अग्रवाल दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी

यातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Pune Porsche Accident

पुणे पोर्शे अपघात प्रकरणी रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणात आरोप असणाऱ्या शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या कार अपघात प्रकरणात पोलिसांनी याआधी विशाल अग्रवाल यांना अटक केली होती. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी याच प्रकरणात शिवानी अग्रवाल यांनाही अटक केलं. त्यांनीच ससून रुग्णालयात जाऊन स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते, असे चौकशीतून समोर आले होते.  (हेही वाचा - Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई Shivani Agarwal हीला अटक, आज न्यायालयासमोर उभे करणार)

या दोघांनाही 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. आता या पाच दिवसांत पुणे पोलीस या प्रकरणाबाबत विशाल आणि शिवानी अग्रवाल यांच्याशी चौकशी करू शकतात. यातून नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर अग्रवाल यांच्या वकिलांनी तसेच पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांनी आपापली बाजू मांडली.  शिवानी यांना रक्ताचे नमुने देण्यास कोणीतरी सांगितले होते. ती व्यक्ती कोण आहे, याचा तपास करायचे आहे. सखोल चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली होती.

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होत आहेत.