IPL Auction 2025 Live

PM Narendra Modi यांच्या पुण्यातील देहू दौर्‍यापूर्वी पुणे पोलिसांना धाडसत्रात भंगार दुकानात आढळली 1105 काडतुसं

ज्यामध्ये 56 जिवंत काडतुसे तसेच 79 अशी काडतुसे आहेत जी काम करत नाहीत आणि 970 बुलेट लीड्स असल्याचे सांगितले जात आहे.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (14 जून) दिवशी देहु (Dehu) च्या दौर्‍यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौर्‍यापूर्वी पुणे (Pune) शहरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 'ऑल आऊट ऑपरेशन' (All Out Operation) राबवण्यात आले आहे. यामध्ये एका भंगार दुकानातून 1105 काडतुसं आढळल्याने खळबळ पसरली आहे. गुरूवार पेठेतील भांगार व्यावसायिकाच्या दुकानावर धाड टाकल्यानंतर ही मोठी बाब समोर आली आहे.

भंगारमालक व्यवसायिक दिनेशकुमार कल्लू सिंग सरोज याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. दिनेशकुमार कल्लूसिंग सरोज यांच्या दुकानातून 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट लीड अशी एकूण 1105 काडतुसे गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केली आहेत.

भंगार व्यावसायिक दिनेश कुमार पर्वती भागात राहतो. तो मूळचा उत्तरप्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मंगळपूरातील कुडा गावातील आहे. पोलिसांनी हत्यारं बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कलम 37(1)(3),135 अंतर्गत महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली आहे.

दरम्यान काल पुण्यातील भवानी पेठ भागातील एका सोसायटीमध्येही स्फोट झाला. विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथे काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. वॉशिंग मशीन रिपेअर करताना स्फोट झाल्याचं सांगण्यात आले होते. रशाद मोहम्मद अली शेख याच्या घरी हा स्फोट झालेला आहे. सध्या या प्रकरणी देखील कसून तपास सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी विविध पालख्या, दिंडीमधील वारकरी देखील सहभागी होणार आहेत. शिळा मंदिर हे एका दगडी पाटाला समर्पित केलेले मंदिर आहे, ज्यावर संत तुकारामांनी 13 दिवस तप केले होते. त्याचबरोबर शिळेजवळील मंदिरात संत तुकारामांची नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे.