Pune Police and Biryani Controversy: तुपातली बिर्याणी फुकटात मागणारी महिला पोलीस अधिकारी चौकीशीच्या फेऱ्यात, उत्तरादाखल म्हणे 'हितसंबंध बिघडल्याने माझ्या विरुद्धचं षडयंत्र'

तुपातली बिर्याणी (Biryani) फुकटात खावीशी वाटणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला फोनवरुन ऑर्डर सोडणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात (Social Media) चांगलीच व्हायरल झाली आहे.

Audio Clip Of Pune | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

तुपातली बिर्याणी (Biryani) फुकटात खावीशी वाटणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला फोनवरुन ऑर्डर सोडणाऱ्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात (Social Media) चांगलीच व्हायरल झाली आहे. प्रसारमाध्यमांतून वृत्त आल्यानंतर या कलिपची राज्याच्या गृहमंत्रालयानेही दखल घेतली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित महिला अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांकडे आपली भूमिकाही मांडली असून, या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे असे म्हटले आहे. या क्लिपमुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात जोरदार चर्चा रंगली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रियंका नारनवरे असे या महिला पोलीस अधिकाऱ्यांचे नाव असून त्या पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असल्याचे समजते. प्रियंका नारनवरे यांनी प्रसारमाध्यमांकडे दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'हा बदल्यांची चर्चा सुरु असतानाच्या काळातील प्रकार असावा. हितसंबंध बिघडल्याने कोणीतरी माझ्याविरुदध हे षडयंत्र रचले आहे. जेणेकरुन माझी प्रतिमा मलीन व्हावी. माझ्या करीअरच्या वाटचालीत बाधा यावी. या क्लिपमधील वाक्ये मी बोलले नाही. तसेच, काही वाक्ये माझ्या आवाजात त्यात मॉर्फ करुन घुसडली आहेत', असा दावाही नारनवरे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कथीत ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे या आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डरदेत आहेत. ही ऑर्डर देताना त्या बिर्याणी मागवत आहेत. त्यांना साजुक तुपातली अथवा उत्तम गुणवत्तेची बिर्याणी हवी आहे. बिर्याणीची ही ऑर्डर देताना त्या आपल्या हद्दीतील हॉटेल असताना त्याला ऑर्डरचे पैसे देण्याची गरज काय? असे सांगतानाही आढळून येतात.

दरम्यान, लेटेस्टली मराठी या ऑडिओ क्लिपची तसेच या ऑडिओ क्लिपमधील कथीत त्या महिला अधिकारी प्रियंका नारनवरे असल्याची पुष्टी करत नाही. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गृहमंत्रालयाने गांभीर्याने घेतल्याचे दिसते. या ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.