Pune Online Fraud Crime: अवघ्या 514 रुपयांचे गॅस बिल भरण्याच्या नावाखाली वृद्धाची 16 लाखांची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक घटना, जाणून घ्या सविस्तर

फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय त्या खात्यातून 7,21,845 रुपये कर्जाची रक्कम काढण्यात यश मिळवले.

Online Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Pune Online Fraud Crime: बदलत्या काळानुसार, भारतात डिजिटलायझेशन (Digitization) खूप वेगाने वाढले आहे, परंतु त्यासोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनाही वेगाने वाढत आहेत. आता गॅस बिल भरण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची 16 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पुण्यातील एका वृद्धाची 514 रुपयांच्या गॅस बिलाच्या सेटलमेंटच्या नावाखाली 16 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा (MNGL) कर्मचारी असल्याचे भासवून या वृद्ध व्यक्तीसोबत घोटाळेबाजांनी ही फसवणूक केली आहे.

अहवालानुसार, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने 27 मार्च रोजी आपण एमएनजीएल कर्मचारी राहुल शर्मा असल्याचे भासवत पिडीत वृद्ध व्यक्तीला फोन केला होता. या वृद्धाचे 514 रुपयांचे गॅस बिल थकीत असून, ते त्वरित भरण्यास सांगितले आले. यासाठी स्कॅमरने त्या व्यक्तीला त्याचे डेबिट कार्ड वापरण्यास सांगितले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने वृद्ध व्यक्तीवर ताबडतोब बिल भरण्यासाठी दबाव टाकल्याने, त्या व्यक्तीने बिल भरण्यासाठी आपले कार्ड वापरले.

फसवणूक करणाऱ्याने पीडितेला एक लिंक पाठवली आणि बिल भरण्यासाठी ही लिंक ओपन करण्यास सांगितले. पुढे पिडीत व्यक्तीने जसे फसवणूक करणारी व्यक्ती सांगेल तसे त्या सूचनांचे पालन केले. पीडितेने हे कार्ड वापरताच त्याला काही मेसेजेस आले. त्याच्या खात्यातून 49,850 रुपये, 49,860 रुपये आणि 12,000 रुपये डेबिट होत असल्याचे ते मेसेजेस होते.

पीडितेने बँकेशी संपर्क साधला असता त्याला समजले की, त्याच्या नावावर 16,22,310 रुपयांचे वैयक्तिक कर्ज मंजूर झाले होते, ज्याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय त्या खात्यातून 7,21,845 रुपये कर्जाची रक्कम काढण्यात यश मिळवले. यानंतर त्या व्यक्तीने तत्काळ पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Pune News: रात्री उशिरा पर्यंत पब चालू असल्यामुळे पुणे पोलिसांकडून कारवाई)

दरम्यान, कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. लक्षात ठेवा गॅस कंपन्या तुम्हाला असे फोन करून बिल भरण्यास सांगत नाहीत. यासोबतच तुमच्या खात्याचे तपशील आणि कार्ड तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका किंवा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.