पुणे: मास्कचा गैर फायदा घेत पतीने हडप केली पत्नीच्या नावे असलेली सारी संपत्ती
या कामासाठी त्याने एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात नेले. बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली.
कोरोना संकट काळामध्ये चेहर्यावरचा मास्क हा आपल्या प्रत्येकासाठी ढाली प्रमाणे आपलं रक्षण आहे. पण याच मास्कचा गैरफायदा घेत पुण्यामध्ये पत्नीची सारी संपत्ती आपल्या नावावर करून घेण्याचा एक प्रताप पतीने केला आहे. कविता जाधव असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे तर पती राहुल जाधव यांच्याकडून त्यांची फसवणूक झाली आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात राहुल जाधव यांनी पत्नी कविताच्या नावावर असलेली सारी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला. या कामासाठी त्याने एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात नेले. बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यासाठी बायकोची खरी कागदपत्र सादर केली. मात्र कोरोना संकटामुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर असलेल्या फोटोमधील व्यक्ती आपल्याकडे नोंद करण्यासाठी आली आहे का? याची प्रत्यक्ष तपासणीच न केल्याने राहुलचा प्लॅन यशस्वी झाला.
ABP Majha च्या रिपोर्ट्स नुसार, दरम्यान जेव्हा नोंदणी आणि मुद्रांक विभागातून जेव्हा कविताला नोटीस आली तेव्हा तिच्या लक्षात हा सारा प्रकार आली. फोटो आणि इतर कागदपत्रांची छाननी केल्यानंतरच असे व्यवहार पूर्ण केले जातात पण कविता आणि राहुलच्या बाबतीत या महत्त्वाच्या नियमाकडे कानाडोळा झाला आणि कविताची फसवणूक झाली. सध्या पोलिस नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये कोणी कर्मचारी या घोटाळ्यामध्ये सहभागी तर नाही ना? याची देखील तपासणी करत आहेत.(नक्की वाचा: Dombivli Crime: प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, बदलापूर-कर्जत रोडच्या कडेला फेकला मृतदेह, डोंबिवली येथील एका महिलेला अटक).
सध्या कविता जाधव यांनी पोलिस स्टेशन मध्ये संबंधित प्रकराबद्दल तक्रार दाखल केली आहे. तर राहुल जाधव यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.