पुणे: Open Manhole मध्ये पडलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाकडून 30 मिनिटांत सुटका

शनिवारी सकाळी कात्रज ट्रॅफिक सिग्नल जवळ ही घटना घडली.

Man fell into an open manhole in Pune (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथे एक 39 वर्षीय व्यक्ती 15 फूट खोल ओपन मॅनहोल (Open Manhole) मध्ये घसरुन पडण्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (2 ऑक्टोबर)  सकाळी कात्रज ट्रॅफिक सिग्नल (Katraj Traffic Signal) जवळ ही घटना घडली. अवघ्या अर्ध्या तासात अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. या व्यक्तीचे नाव विजय बेल बहादुर असे आहे. त्याची सुटका केल्यानंतरचा एक व्हिडिओ अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) शेअर करण्यात आला आहे.

आपण सुखरुप आहोत, हे कळाल्यानंतर बेल बहादुर व्हिडिओत रडताना दिसत आहे. तर अग्निशमन दलाचा एक अधिकारी त्यांच्या शरीराभोवती असलेली जाड दोरी काढत त्याला पाणी देताना दिसत आहे. (Mumbai Rains: मुंबईकरांसाठी Open Manhole ठरतायत जीवघेणे; पाहा व्हिडिओ)

ANI Tweet:

या मॅनहोलचे झाकण चोरीला गेले असून पोलिसांनी या मॅनहोलभोवती बॅरिकेड लावून ब्लॉक केले होते. बेल बहादुर घसरुन पडल्याचे कुमार कांबळे या पादचाऱ्याने पाहिले आणि त्याने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच सिंहगड सबफायर स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि रश्शीचा वापर करुन बेल बहादुर यांना अर्ध्या तासांत बाहेर काढले. दरम्यान, बेल बहादूर हा नेपाळचा रहिवासी असून तो कात्रज येथील शनीनगर येथे राहतो. एका हॉटेलमध्ये तो आचारी म्हणून काम करतो.