पुणे जिल्हा मतदार संघ (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे पुणे (Pune). आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा (Congress-NCP) बालेकिल्ला म्हणून हा जिल्हा ओळखला जायचा मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने (BJP) इथे खिंडार पाडले आहे. आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीने भाजप समोर फार मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यात तब्बल 21 मतदार संघ आहेत. मागच्या विधानसभेमध्ये भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या पराभवानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पुन्हा आपली पकड घट्ट करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात कोथरूड आणि खडकवासला हे दोन्ही मतदार संघ अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादीसाठी फार महत्वाचे आहेत. चला पाहूया पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आणि लढती

कसबा पेठ  (Kasaba Peth) – पुण्यातील सदाशिव, नारायण, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि कसबा अशा महत्वाच्या पेठांचा या मतदारसंघात समावेश होतो. भाजपचे गिरीश बापट इथून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, मात्र गिरीश बापट खासदार झाल्याने, यावेळी भाजपने मुक्ता टिळक यांना इथून उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून नगरसेवक अरविंद शिंदे त्यांच्या विरुद्ध लढणार आहेत, तर बहुजन वंचित आघाडीकडून मिलिंद ई. काचीदेखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 2014 साली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही भाजपने इथे चांगले यश मिळवले. मात्र यावेळी ब्राम्हण, मराठा यांच्यासोबत मतदारसंघातील अल्पसंख्यांक आणि दलित समाजासाठी वंचितच्या उमेदवारामुळे ही लढत महत्वाची ठरणार आहे.

कोथरूड (Kothrud)– सध्या पुण्यात आणि अवघ्या महाराष्ट्रात कोथरूड मतदारसंघाचा मुद्दा फार गाजत आहे. भाजपने इथे चंद्रकात पाटील यांना उमदेवारी दिली आहे. याच मुद्यावरून कोथरूडकर आक्रमक झाले आहेत. पुण्यात पूर आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकात पाटील वेळेवर फिरकलेही नाहीत हा राग मनात ठेऊन आम्हाला कोथरूडमधीलच आमदार हवा अशी मागणी होत आहे. यावर उपाय म्हणून चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये भाड्याने घर घेतल्याचेही समजते. वंचितकडून दीपक नारायण शामदिरे निवडणूक लढवत आहेत तर, मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे मनसेला पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिला नाही. 2014 मध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मेधा विश्राम कुलकर्णी आमदार म्हणून निवडणून आल्या होत्या. या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार आहेत.

(हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: बिग बॉसचे कलाकार लागले निवडणुकीच्या कामाला; कोथरूडमध्ये करणार 'या' गोष्टीचा प्रचार)

खडकवासला (Khadakwasla) – पुणे शहरातील आठही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने इथून युवा नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना इथे उमेदवारी दिल्याने शिवसेनच्या रमेश कोंडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तापकीर हे 2014 साली 1,11,531 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिलीप बराटे हे उभे होते. हा मतदारसंघ शहर आणि उपनगर अशा दोन्हींमध्ये विभागला गेला आहे. जी 11 गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाली त्यामधी 6 गावे या मतदारसंघातील आहेत. सुप्रिया सुळे लोकसभेमध्ये विजयी झाल्यावरही त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क कायम ठेवला होता. त्यामुळे आता इथे काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, वेळी विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.