Pune Dam Water Level: पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ, आज पाणीकपात रद्द होणार?

खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या काही महिनाभरापासून पु्ण्यातील काही विभागात पाणी कपात (Water Cut) ही लागू करण्यात आली आहे. पाणीकपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune City) आनंदाची बातमी आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा (Water Storage) जमा झाला आहे. यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न हा तुर्तास मिटला असून लवकरच पुण्यात लागू केलेली पाणीकपात ही मागे घेतली जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: आज मुंबई कोकणसह इतर भागात पावसाची स्थिती काय असणार? जाणून घ्या)

पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता या प्रकल्पात एकूण 21.18 टीएमसी (72.65 टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला होता. खडकवासला धरणसाखळीत गेल्यावर्षी इतका पाणीसाठा जमा झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 28 जुलै रोजी प्रकल्पात 21.46 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता, गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून 3424 क्युसेस वेगाने मुठा नदीत पाणी सोडले जात होते.

एकीकडे धरणातून पाणी सोडले जात असतानाही पुणेकर मात्र, पाणीकपातीमुळे हैराण झाले आहेत. आता ही पाणीकपात रद्द करावी, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पाणीकपात रद्द केली जाणार असल्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.